Spread the love
Submitted originally by – Mr Ramakant Kulkarni – Retd. General Manager – NABARD[National bank for Agriculture and Rural Development]

“गणिती” हे अच्युत  गोडबोले व माधवी ठाकूर देसाई या लेखकद्वयीनी लिहिलेले पुस्तक नुकतेच वाचले. या पूर्वी अच्युत गोडबोलेंची तीन पुस्तके मी वाचलेली होती :  किमयागार, बोर्डरूम व मुसाफिर ! जगातल्या अनेक ग्रंथांचा धांडोळा घेऊन जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने परंतु रंजकता न घालवता  कुठल्याही कठीण किंवा सामान्यांना शुष्क वाटेल अशा विषयावर मराठीत विक्रमी खपाची पुस्तके लिहिण्याचा विक्रम अच्युत गोडबोलेंच्या नावावर आहे. मागील तीन पुस्तकांची रंजकता व विषय सोपा करून सांगण्याची गोडबोलेंची हातोटी माहित असल्याने अर्थातच ह्या ग्रंथाविषयी मला तितकीच उत्सुकता होती.  मात्र त्या मानाने हे पुस्तक वाचण्यासाठी  घेण्यास माझ्याकडून तसा बराच उशीर झाला. या पुस्तकावर समीक्षक व वाचकांच्या प्रतिक्रिया अगोदरच येऊन गेलेल्या असूनही मला ह्या पुस्तकाविषयी माझे विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणूनच हा लेखन प्रपंच !

ह्यात अगदी ” स्टोन एज ” म्हणजे आदिमानवाच्या काळापासुन म्हणजे केवळ वस्तू मोजण्यासाठी अंक वापरणे तो सेट थेअरी, लॉजिक,इन्फिनिटी इथपर्यंत गणिताचा प्रवास कसा झाला यासाठी लेखकद्वयीनी इंग्रजी व मराठीतील ६० पुस्तके व कांही संकेतस्थळे यांचे परिशीलन करून हे पुस्तक लिहिले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी शुद्ध गणितातील तज्ज्ञ मंडळीचेही मार्गदर्शन घेतले .
यामध्ये सुमेरियन संस्कृती, इजिप्तशिअन , अरब, भारत व चीन इथपासून गणिताच्या उत्क्रांतीचा वेध घेतला असून इ.स. पूर्वी ८०० वर्षे भारतातील आर्यभट्ट ब्रह्मगुप्त ज्याने शून्याचा शोध लावला , तसेच भास्कराचार्य , वराहमिर , महावीराचार्य ते  रामानुजम यांच्या  योगदानाचा धांडोळा घेत युरोपियनांनी यात दिलेल्या महत्वाच्या योगदानापर्यंत व उत्कर्षापर्यंत नेण्यासाठी जर्मन, फ्रेंच , ब्रिटिश ,नार्वे , स्विस इ देशातील गणितज्ञानी घातलेली मोलाची भर ह्याचे वर्णन आले आहे .अर्थात
यासाठी त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. उदा. चर्चचा विरोध, इतर गणितज्ञाना सिद्धता करून दाखविणे तर कधीकधी विचित्र राजे/राण्या उदा देकार्तला भेटलेली स्वीडनची  राणी ख्रिस्तिना हि विचित्र राणी. यातील कांही गोष्टी आपल्या समजुतींना अत्यंत धक्कादायक वाटतील अशाही आहेत.  उदा. उमर खय्याम आपल्याला फक्त रुबायांसाठीच माहित आहे , मात्र तोही एक गणितज्ञ होता व त्याने गणितात मोलाची भर टाकली हे आपल्याला धक्कादायकच वाटेल !
कांही गणितज्ञाना अत्यंत कमी आयुष्य लाभले उदा. गॅल्व्हा,सोन्या  kovalevsakiya काहींना अत्यंत दारिद्र्य सहन करावे उदा निमान , तर काहींना राजेरजवाड्यांची जवळीक भोवली. माऊंज-फुरीए राज मैत्रीचे बळी ! थेओना ही जगातली पहिली गणितज्ञ तर तिच्या नंतरची हायपेशिया या स्त्री गणितज्ञाचा झालेला अत्यंत हृदयद्रावक अंत अशा अनेक गोष्टी आपल्यासारख्या सामान्य वाचकाला अज्ञात होत्या त्या तर कळतातच परंतु ह्या सर्व वाचनातून एक गोष्ट अधोरेखित होते ती ही कि या सर्व हालअपेष्टा सहन करूनही या लोकांची गणितावरील निष्ठा अजिबात ढळली नाही  . यात “गणिताचा बादशहा गाऊस, ऑयलर” , “गणिताचा शिल्पकार रीमान” , “एका निर्धनाची गणिती श्रीमंती” ,”दुर्लक्षित लायबलीज” असे प्रकरणांचे मथळे खरोखर अत्यंत उचित वाटतात.
लायबीनीज व न्यूटन यांच्यातील वाद व ब्रिटिश आणि  फ्रेंचातील एकमेकांविषयी असलेली अढी, त्यामुळे ब्रिटिशांनी स्वतःचे करून घेतलेले नुकसान अशा अनेक मनोरंजक हकीकती या पुस्तकातुन आपल्या समोर येतात व आपण स्तिमित होतो.
मला तर या पुस्तकातील सर्वच नाही पण कितीतरी गणितज्ञावर आपल्याकडे वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या “एक होता कार्व्हर” सारखी चरित्त्रे लिहिण्यास उत्सुक व्हावे असे अनेकदा जाणवते. सामान्य वाचक जो गणितात तज्ञ नाही , त्यांच्यासाठी ह्यात शुद्ध गणित, बीजगणित, भूमिती , संख्याशास्त्र , संभाव्यता शास्त्र , तर्कशास्त्र यातील वेगवेगळ्या गणितज्ञानी भर घातलेल्या क्रिया , शोध, सिद्धता इ. सर्व सोप्यातसोप्या भाषेत आकृत्यांसह समजावून सांगितले आहे.
सदरील पुस्तकात अनेक मनोरंजक किस्से, त्या त्या काळातील , प्रदेशातील प्रथा, परंपरा, धार्मिक, राजकीय कारणास्तव तसेच  सह गणितज्ञांकडून कधी कधी झालेला टोकाचा विरोध, असूया, द्वेष,श्रेयासाठी चढाओढ अशा  अगणित  गोष्टी अत्यंत रंजकरित्या पुढे येतात. मात्र हे सर्व मुळातच वाचण्यासारखे आहे. खरे तर लेखकद्ववयींचे यामागील कष्ट व सादरीकरण विचारात घेतले व या संपूर्ण सागरमंथनातून आपल्यापुढे आणलेले ज्ञानामृतकण पहिले की असे वाटते कि त्यांना खरे तर एखाद्या विद्यापीठाने सन्माननीय पी एच डी प्रदान करावी.
असे हे पुस्तक ज्याने माझ्या मनाचा गेले अनेक दिवस ताबा घेतला आहे. यातून शक्यतो कमीत कमी शब्दात माझे निरीक्षण नोंदवून रजा घेतो. मात्र प्रत्येक मराठी वाचकाने हे पुस्तक जरूर जरूर वाचावे अशी विनवणी करून श्री अच्युत गोडबोले व माधवी ठाकूर-देसाई यांच्याप्रती नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो. त्यांना अजून अशाच ग्रंथ लेखनासाठी शुभेच्छा व दीर्घायुष्य चिंतीतो !
गणिताची आवड निर्माण करणारी एक रसिली सफर :
                  गणिती
लेखक: अच्युत गोडबोले
           डॉ. माधवी ठाकूर देसाई
मनोविकास प्रकाशन
प्लॉट नंबर ३ए , चौथा मजला ,
शक्ती टॉवर्स, नूमवि समोर
६७२ नारायण पेठ , पुणे ४११०३०
आता amazon वर सुद्धा उपलब्ध – पुस्तक खरेदी करण्यासाठी इमेज वर क्लिक करा.

Spread the word about us 🙂
पुस्तक समीक्षा – अच्युत गोडबोले ह्यांची गणिती – Pleasantreads book review
Tagged on:     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)